।। श्री गुरुदत्तराजमूर्ती ।।
श्री गुरूदत्तराजमूर्ती । ओवाळितो प्रेमे आरती । ब्रह्मा विष्णू शंकरचा । असे अवतार श्री गुरुचा ।। कराया उद्धार जगताचा। जाहला बाळ अत्रि ऋषीचा । धरिला वेष असे यतिचा । मस्तकी मुकुट शोभे जरीचा ।। कंठी रूद्राक्ष माळधरूनी । हातामध्ये आयुध बहुत वर्णी । तेणे भक्तांची क्लेषहरूनी । त्यासी करूनी नमन । अघ शमनं । होईल रिपुगमण। गमण असे त्रैलोक्यावरती ओवाळितो प्रेमे आरती ।।१।।
गाणगापुरी वस्ती ज्यासी । प्रिती औदुंबर छायेची । भिमा अमरज्या संगमासी । भक्ती असे बहु शिष्यांची । वाट दाऊनिया योगाची । ठेव देतसे निज भक्तीची। काशी क्षेत्री स्नान करितो । करविर भिक्षेला जातो । माहूर निद्रेला वरितो । तर तरतरीत । छाती धरधरीत । नेत्र गरगरीत । शोभतो त्रिशूल जया हाती ।। ओवाळितो प्रेमे आरती ।।२।।
अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळितो सौख्य कंदा । तारीहा दास हृदय नंदा । सोडवी विषय मोह छंदा ।। आलो शरण अत्रिनंदा । दावी सद्गुरू ब्रह्मानंदा । चुकवी चौऱ्यांशीचा फेरा । घालती षडरिपु मज हा घेरा ।। गांजली पुत्र पौत्र दारा । वदवी भजन । मुखीतव पूजन करितसे स्तवन । तयाचे बलवंतावरती । ओवाळितो प्रेमे आरती ।।३।।